खडकीतील बेकायदेशीर पथारीधारकांवर कॅन्टोन्मेंट बोर्ड कारवाई करणार का ?

छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांचा सवाल 
Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे :       खडकी बाजार येथील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोरील जागा पथारीधारकांना बेकायदेशीरपणे भाड्याने दिल्यामुळे बाजारातील रस्ता हा अरुंद झाला आहे. परिणामी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने अतिक्रमण काढून नागरिकांना पार्किंगसाठी करीता जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी केली आहे. 
रामभाऊ जाधव यांनी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सीईओ’ना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की खडकी बाजार ही पिंपरी-चिंचवड व पुणे शहरा परिसरातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या बाजारपेठेत खडकी, बोपोडी, दापोडी, रेंजहिल्स, सांगवी, पिंपळे गुरव, औंध, विश्रांतवाडी अशा अनेक भागातील नागरिक खरीदीसाठी येत असतात. मात्र, खडकीतील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोरील जागा ठराविक भाडे घेऊन पथारीधारकांना बेकायदेशीरपणे भाड्याने दिल्यामुळे बाजारातील रस्ता हा अरुंद झाला आहे.
नागरिकांना गाड्या पार्किंग करण्यासाठी जागा मिळत नसल्याने वाहतूक पोलिसांचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.  या बेकायदेशीर पथारी धारकांकडून बोर्डाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना आर्थिक मोबदला मिळत आहे का? असा प्रश्न खडकीतील नागरिकांना पडला आहे.
त्यामुळेच बोर्डाचे अधिकारी व कर्मचारी या पथारीधारकांवर कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे. बाजारातील क्राऊन हॉटेल ते कल्पेश ज्वेलर्स, कल्पेश ज्वेलर्स ते डी. आर. गांधी चौक, तसेच पी.एम.पी. बस स्टॉप परिसरात पथारीधारकांनी अतिक्रमण केले आहे. बोर्डाने अतिक्रमण काढून नागरिकांना पार्किंगसाठी करीता जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही रामभाऊ जाधव यांनी केली आहे.

Share this Newz