यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएस व स्वामी विवेकानंद केंद्राच्यावतीने युवक प्रेरणा शिबीर उत्साहात संपन्न

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : 

पिढीने अगदी कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा स्वतःला सातत्याने सकारात्मक विचारांनी प्रेरित करून कृतिशील ठेवणे काळाची गरज आहे असे मत स्वामी विवेकानंदांच्या चरित्राचे अभ्यासक प्रा. नरेंद्र नायडू यांनी व्यक्त केले. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स(आयआयएमएस) व कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्राच्या चिंचवड शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय युवक प्रेरणा शिबिरात ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की,प्रत्येक युवकाने नरेंद्र ते विवेकानंद हा प्रवास जाणून घेण्यासाठी विवेकांनदांचे चरित्र अभ्यासल्यास लक्षात येईल की, विद्यार्थी दशेत, महाविद्यालयीन दशेत असताना नरेंद्राचे जीवन तुमच्या आमच्यासारखेच सामान्य होते मात्र पुढे पुढे व्यासंगी वाचन,मनन आणि चिंतनामुळे आणि रामकृष्ण परमहंस यांच्या सहवासामुळे नरेंद्रचा विवेकानंद बनण्याचा प्रवास कस कसा होत गेला हे जाणून घ्यायला हवे.विवेकानंदांच्या जीवनचरित्रातून खूप काही शिकण्यासारखे असून प्रत्येकाने जमेल तितका त्यांच्या चरित्रपर पुस्तकांचे वाचन केल्यास प्रत्येकाचा माणूस म्हणून समृद्ध होण्याचा प्रवास अधिक सुकर होईल अशी आशा प्रा. नायडू यांनी व्यक्त केली.

युवक प्रेरणा शिबिराच्या व्दितीय सत्रात मार्शल आर्ट तज्ञ् जयदेव म्हामणे यांनी विविध प्रात्यक्षिकांद्वारे युवक युवतींनी स्वसंरक्षण कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले.यानंतर विवेकानंद केंद्राचे योगेश भगत व अक्षय बारंगे यांनी विविध मनोरंजनात्मक खेळांद्वारे संघटन कौशल्य, एकमेकांप्रती आदरभाव या भावना कशा वृद्धिंगत होतील याविषयी मार्गदर्शन केले.

तर शिबीराच्या तृतीय सत्रात जगजीत कुलकर्णी यांनी त्यांच्या व्याख्यानात विद्यार्थ्यांना आपल्यातील मी पणाची भावना व्यापक करून परस्परांविषयी कोणताहीआपपरभाव न ठेवता सर्वांसोबत आपलेपणाची भावना विकसित करण्यासाठीचा दृष्टिकोन कसा विकसित करावा याबद्दल विविध उदाहरणांद्वारे मार्गदर्शन केले.

या एकदिवसीय शिबिराचे प्रास्ताविक करताना आयआयएमएस चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी सांगितले की अशा प्रकारच्या शिबिरातून व्यक्तिमत्व विकास, सभाधीटपणा अशा गुणांची वृद्धी होते. या शिबिरासाठी विवेकानंद केंद्राच्या चिंचवड शाखेच्या प्रमुख अरुणाताई मराठे,पवन शर्मा, महेश नागलगाय, अविनाश गोखले, अस्मिताताई करमरकर,आदिती चिपळूणकर राहुल भालेकर, पुंडलिक मते,प्रा.महेश महांकाळ यांच्यासह संस्थेचे सर्व अध्यापक वर्ग व विद्यार्थ्यानी आपला सक्रिय सहभाग नोंदवला.


Share this Newz