उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून घोलप महाविद्यालयाचे विशेष कौतुक

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पुणे : 

पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिक संकलन अभियान, ग्राम सर्वेक्षण अभियान, लसीकरण शिबिर असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आघाडीवर असणाऱ्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांनी विशेष कौतुक केले.


पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना त्यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले. यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम. पवार, सह सचिव (प्रशासन) ए.एम. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम महाविद्यालयातील विविध विभागांमार्फत मावळ तालुक्यातील कुसगाव (पवना मावळ) येथे करण्यात आलेला ग्राम सर्वेक्षण अहवालाचे पुस्तक स्वरूपामध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाने गावच्या विकासासाठी भाषा, परंपरा, इतिहास, कृषी, अर्थ, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामध्ये केलेल्या सर्वेक्षणाबद्दल उपस्थित मान्यवरांनी महाविद्यालयाचे विशेष अभिनंदन केले. तसेच प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी कुसगावला लाभलेल्या समृद्ध पर्यटन संपन्नते विषयी माहिती देत असताना अजित पवार यांनी महाराष्ट्र शासनाच्या पुढील बैठकीत कुसगावच्या पर्यटन विकासासंबंधी चर्चेचे ठराव मांडण्याचे आदेश स्वीय सहाय्यकांना दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयामार्फत पवार यांच्या पर्यावरण संवर्धन कार्यामधून प्रेरणा घेत गेल्या वर्षभरापासून प्लास्टिक संकलन अभियान यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. यामध्ये गेल्या वर्षभरात झालेल्या प्लास्टिक संकलनाची माहिती देताना प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे म्हणाले की, आतापर्यंत पंधरा महिन्यांच्या कालावधीमध्ये सुमारे ३०० किलो पेक्षा जास्त प्लास्टिक जमा करून ते सागर मित्र अभियान या पर्यावरणवादी स्वंयसेवी संस्थेकडे पुढील प्रक्रियेसाठी दिले आहे. तसेच याकरिता कमिंस ग्रुप इंडिया ही संस्था विशेष सहकार्य करत असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी विशेष उपस्थित राहत या अभियानाबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केले आहे.

त्याचबरोबर बऱ्याच कालावधीनंतर ऑफलाइन पद्धतीने महाविद्यालय सुरु होत असताना शासन निर्णयानुसार लसीच्या दोन मात्रा झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय देताना महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकरीता आयोजित केलेल्या लसीकरण शिबिराबद्दल कौतुकाची थाप दिली.


Share this Newz