घोलप महाविद्यालयात ‘स्वच्छ भारत’ अभियान

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पुणे : 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारच्या क्रीडा व युवक मंत्रालयातर्फे १ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान आयोजित स्वच्छ भारत अभियानांतर्गत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत महाविद्यालय परिसर व औंध जिल्हा सामान्य रुग्णालय येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. ज्ञानेश्वर जांभुळकर, प्रा. अमृता इनामदार, प्रा. जितेंद्र वडशिंगकर, प्रा. धनश्री कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

अभियानाच्या सुरुवातीला उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी सर्वप्रथम भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारतर्फे आयोजित विविध उपक्रमांची माहिती देत स्वच्छ भारत अभियानाचे महत्त्व विशद केले. तसेच नव्यानेच राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये भाग घेतलेल्या स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजनेची संकल्पना व महत्व स्पष्ट करत अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव निर्माण होत, एक जबाबदार नागरिक घडण्यास मदत होते असे मत व्यक्त केले.

या अभियानाच्या पहिल्या टप्प्या अंतर्गत महाविद्यालय क्रिडांगण व आजूबाजूच्या परिसरामध्ये स्वच्छता करण्यात आली. यावेळी पिंपरी – चिंचवड महानगर पालिकेच्या स्वच्छता विभागातील सहा. आरोग्याधिकारी महेश आढाव, आरोग्य निरीक्षक उद्धव ढवरी, दशरथ बांबळे, रवी शेकडे, विकास कांबळे, कविता गोहेर, विनोद कांबळे, सिद्धार्थ जगताप यांनी विशेष सहकार्य केले.

या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय औंध येथील बाह्य परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी स्वच्छता अभियान अंतर्गत घोलप महाविद्यालय करत असलेल्या कार्याबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन करत राष्ट्रीय सेवा योजना विभाग स्वंयसेवकांचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, राष्ट्रीय किशोर – किशोरी स्वास्थ कार्यक्रमाच्या पुणे जिल्हा समन्वयक कांचन सावंत हे देखील उपस्थित होते.

यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे उपस्थित स्वयंसेवक व शिक्षकांना मास्क, हँडवॉश, हातमोजे, हेड कॅप यांचे वाटप करण्यात आले. या दोन्ही अभियानामध्ये नेहरू युवा केंद्राचे प्रोग्राम सुपरवायझर सिद्धार्थ चव्हाण, सांगवी विकास प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ओमकार भागवत यांनी उपस्थित राहत महाविद्यालयाचे अभिनंदन केले.
सदर स्वच्छता अभियान अंतर्गत महाविद्यालय व रुग्णालय परिसरामध्ये स्वच्छता करत सुमारे ६०० किलो पेक्षा जास्त कचरा जमा करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.

स्वच्छता अभियानाच्या शेवटी कांचन सावंत व डॅा. वसुधा मनियार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्वच्छता शपथ दिली.
कोविड – १९ विषयक शासन नियमांचे पालन करत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या ३० स्वंयसेवकांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला.

या अभियानाच्या यशस्वीतेसाठी राजू काटे, रोहिदास खोंडे, अशोक मगर, बाबाजी गायकवाड, सचिन शितोळे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


Share this Newz