घोलप महाविद्यालयामध्ये अथर्वशीर्ष पठण उपक्रम

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आघाडीवर असणाऱ्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये अनंत चतुर्दशी निमित्त प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयातील आयक्युएसी समिती, सांस्कृतिक विभाग, पालक सभा समिती आणि हरिभाई देसाई महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गणपती अथर्वशीर्ष पठण या ऑनलाईन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हरिभाई देसाई महाविद्यालयातील द्वितीय वर्ष कला शाखेच्या पूजा वनशेट्टी या विद्यार्थिनीने गायलेल्या गणेश स्तवनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, डॉ. विलीना इनामदार, डॉ. माया माईनकर, डॉ. संगीता जगताप, प्रा. प्रकाश पांगारे, प्रतीक घोलप, प्रा. संतोष खजिनदार आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना हरिभाई देसाई महाविद्यालयाच्या कलामंडळ प्रमुख डॉ. विलीना इनामदार यांनी अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम आयोजित करण्यामागे असलेले उद्देश व महत्व स्पष्ट केले. तसेच संस्कृत सुभाषिताचा दाखला देत असताना कार्य करण्याची प्रेरणा ही आंतरिक असते, असे नमूद करत शास्त्रांचे महत्त्व स्पष्ट केले.

आपल्या मनोगतामध्ये बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी अथर्वशीर्ष म्हणजे विचारांची स्थिरता असे नमूद करत अनंत चतुर्दशी निमित्त आयोजित अथर्वशीर्ष पठण उपक्रमाची संकल्पना स्पष्ट केली. तसेच गणपतीचे वेगवेगळी रूपं, गणेश आरतीचे महत्त्व व अर्थ सविस्तर समजावून सांगत कोरोनाचे संकट लवकरच टळत पुढील गणेशोत्सव उत्साहात साजरा करायला मिळू दे, अशी विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना केली.

याप्रसंगी डॉ. विलीन इनामदार आणि डॉ. माया माईणकर यांनी अथर्वशीर्ष पठण करत असताना मनाची स्थिती कशी असावी, कोणत्या आसनामध्ये बसावे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करत आपल्या तेजस्वी शैली व अतिशय स्पष्ट उच्चारामध्ये अथर्वशीर्षाचे पठण केले.
हरिभाई देसाई महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी प्रतीक घोलप यांनी अथर्वशीर्षाचे महत्त्व स्पष्ट करताना गणपतीच्या विविध रुपांची व त्याबद्दलच्या संतांच्या विचारांचा दाखला दिला. तसेच एखादे काम पुर्ण होत नसताना अथर्वशीर्षाच्या पठणाने एकाग्र चित्त ठेवत काम यशस्वी कसे करता येईल याबाबत माहिती देत गणेश पुराणातील विविध प्रसंगांवर प्रकाश टाकला.

मंत्र उच्चारणाचे महती सांगताना हरिभाई देसाई महाविद्यालयाचे ग्रंथपाल संतोष खजिनदार म्हणाले की, मानवामध्ये १०८ प्रकारचे मनोविकार असुन प्रत्येक विकाराच्या शांतीसाठी १०८ वेळा पठण केले जाते केले. तसेच नामस्मरणाने व्यक्तिमत्व प्रगल्भ होत जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो असे नमूद करत ऐहिक व पारलौकिक सुखाची संकल्पना स्पष्ट केली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित गणेश भक्तांनी डॉ. विलीन इनामदार आणि डॉ. माया माईणकर यांच्या साथीने आपापल्या ठिकाणी ॲानलाईन पद्धतीने १०८ वेळा ‘ओम गण गणपतेय नमः’ या मंत्राचा जागर केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. माया माईनकर तर आभार प्रदर्शन डॉ. संगीता जगताप यांनी केले. कार्यक्रमाच्या तांत्रिक यशस्वीतेकरिता प्रा. सोनल कदम, प्रा. किर्ती करंजावणे, वीरेन चव्हाण यांनी विशेष सहकार्य केले.
सदर कार्यक्रमामध्ये झूम ॲप व यु- ट्यूब लाईव्ह द्वारे बाबुरावजी घोलप महाविद्यालय व हरिभाई देसाई महाविद्यालयातील सुमारे २५० पेक्षा जास्त विद्यार्थी, शिक्षक व पालक सहभागी झाले होते.


Share this Newz