The Newz Biz Team, PUNE
एकीकडे महापालिका मैलाशुद्धीकरण केंद्रांसाठी करोडो रुपये खर्च करताना दिसते; तर दुसरीकडे कंपन्यांचे फेसाळलेले प्रदूषित पाणी, तसेच ड्रेनेज लाईनचे मैलायुक्त पाणी थेट नदीपात्रात येत आहे. यामुळे पिंपळे निलख परिसरात प्रचंड दुर्गंधी सुटली असून, मुळा नदीपात्रात जलपर्णीची चादर पसरली आहे. नदीपात्रातील जलपर्णी काढून टाकावी आणि प्रदूषित पाणी मुळा नदीपात्रात सोडणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शिरीषअप्पा साठे यांनी केली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून नदीपात्रात सोडल्या जात असलेल्या प्रदुषित पाण्यामुळे अवाढव्य प्रमाणात जलपर्णी वाढत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होऊन नदीपात्र गलिच्छ झाले आहे. त्याच्या दुर्गंधीमुळे आणि डासांच्या उपद्रवामुळे नागरीक अगोदरच त्रासून गेले आहेत. त्यात भरीस भर म्हणून मोठी ड्रेनेज लाईन फुटल्याने मैलायुक्त पाण्याचा फ्लो थेट मुळा नदीपात्रात सोडून दिला आहे. फुटलेल्या ड्रेनेज लाईनमधून मैलायुक्त पाणी नदीपात्रात येत आहे. मैलाशुद्धीकरण केंद्राकडे या ड्रेनेजलाईनमधून मैलायुक्त पाणी जात नाही. हे मैलापाणी थेट नदीपात्रात जात आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या मैलाशुद्धीकरण केंद्राचा उपयोग काय ? असा सवाल आहे. या ड्रेनेज लाईन गेल्या कित्येक महिन्यांपासून लिकेज आहेत. याबाबत मल:निस्सारण विभागाकडून कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे.
एवढेच नाही तर अनेक कंपन्या दूषित केमिकलयुक्त पाणी नदीपात्रात सोडत आहेत. त्यामुळे पिंपळे निलख नजीक हे दुषित पाणी फेसाळलेल्या अवस्थेत पाहायला मिळते. पाण्याच्या दुर्गंधीचा नदीकाठच्या रहिवाश्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे आरोग्याच्या समस्याही उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल करण्यात येणार असून, यामध्ये महापालिका आयुक्त, महापालिकेचा संबंधित विभाग आणि चालू असलेल्या कामाचा ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे शिरीषअप्पा साठे यांनी सांगितले.
महापालिका प्रशासन नदीप्रदुषणाबाबत कमालीचे उदासीन आहे. मुळा नदीपात्रात ड्रेनेजमधून लाखो लिटर मैलायुक्त पाणी मुळा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. या प्रकाराचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. मैलायुक्त पाणी थेट नदीपात्रातच सोडायचे असेल, तर मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे उभारून नागरीकांच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा करायचा कशाला ? मैलाशुद्धीकरण केंद्रे पूर्ण क्षमतेने चालली पाहिजेत. नदीपात्रात थेट मैलापाणी सोडून महापालिका प्रशासन नागरीकांच्या आरोग्याशी खेळत आहे. तातडीने या ड्रेनेज लाईन दुरुस्त करण्यात याव्यात. तसेच जलपर्णी काढून टाकून डासांपासून नागरिकांची सुटका करण्यात यावी.
शिरीषअप्पा साठे, सामाजिक कार्यकर्ते, पिंपळे निलख








Leave a Review