राहण्यायोग्य शहरांच्या क्रमवारीत पुणे शहर दुसरे; बंगळुरू अव्वल

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

देशभरातील राहण्यायोग्य शहरांच्या क्रमवारीमध्ये पुणे शहराचा दुसरा क्रमांक लागला आहे. या क्रमवारीमध्ये बंगळुरू शहराला अव्वल क्रमांक मिळाला आहे. पुण्यापाठोपाठ अहमदाबाद, चेन्नई, सूरत, कोईमतूर, वडोदरा, इंदूर आणि नवी मुंबई या शहरांचा क्रमांक लागला आहे.

राहणीमान सुलभता निर्देशांक आणि स्थानिक स्वराज्य संस्था कामगिरी निर्देशांकाच्या अंतिम मानांकनांची घोषणा आज गृहनिर्माण व नागरी व्यवहार राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ऑनलाइन कार्यक्रमात केली. दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेली शहरे आणि दहा लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांसाठीही राहणीमान सुलभता निर्देशांक 2020 अंतर्गत मानांकनाची घोषणा करण्यात आली. यासाठी 2020 मध्ये मूल्यांकन सर्वेक्षण घेण्यात आले होते. त्यात 111 शहरांनी भाग घेतला. त्यांची दोन गटात वर्गवारी करण्यात आली होती. दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असणारी शहरे आणि दहा लाखांहून कमी लोकसंख्या असणारी शहरे. यात स्मार्ट सिटीज कार्यक्रमांतर्गत सर्व शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

दहा लाखांहून अधिक लोकसंख्येच्या गटात बंगळुरू प्रथम क्रमांकावर, त्यानंतर पुणे, अहमदाबाद, चेन्नई, सूरत, नवी मुंबई, कोईमतूर, वडोदरा, इंदूर आणि बृहन्मुंबई यांचा क्रमांक लागतो. दहा लाखांहून कमी लोकसंख्येच्या गटात, राहणीमान सुलभता निर्देशांकात सिमला शहर सर्वोच्च स्थानावर असून त्यानंतर भुवनेश्‍वर, सिल्वासा, काकीनाडा, सालेम, वेल्लोर, गांधीनगर, गुरुग्राम, दावणगिरी आणि तिरुचिराप्पल्ली यांचा क्रमांक आहे .

राहणीमान सुलभता निर्देशांकाप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्था कामगिरी निर्देशांकांतर्गत मूल्यांकन करण्यात आले. लोकसंख्येनुसार दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिका आणि दहा लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या महापालिकांची वर्गवारी करण्यात आली. दहा लाखांहून अधिक लोकसंख्येच्या गटात इंदूर, सर्वोत्तम महापालिका ठरली, त्यानंतर सूरत आणि भोपाळ यांचा क्रमांक आहे. दहा लाखाहून कमी लोकसंख्येच्या गटात नवी दिल्ली नगरपरिषद आघाडीवर आली असून त्यानंतर तिरुपती व गांधीनगर यांचा क्रमांक लागतो. राहणीमान सुलभता निर्देशांकाची चौकट अधिक मजबूत करण्यासाठी त्याच्या व्याप्तीचा विस्तार करीत, देशात प्रथमच स्थानिक स्वराज्य कामगिरी निर्देशांक मूल्यांकन देखील केले गेले. या निर्देशांकात दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये इंदूरचा पहिला क्रमांक लागला.

 त्यापाठोपाठ सूरत, भोपाळ, पिंपरी चिंचवड, पुणे, अहमदाबाद, रायपूर, नवी मुंबई, विशाखापट्टणम आणि वडोदरा या शहरांचा क्रमांक लागला. तर गोवाहटीचा क्रमांक सर्वात शेवटचा लागला. तर दहा लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये नवी दिल्लीचा अव्वल क्रमांक लागला. त्यापाठोपाठ तिरुपती, गांधीनगर, कर्नाल, सालेम, तिरुप्पूर, बिलासपूर, उदयपूर, झांशी आणि तिरुनेलवेली या शहरांचा क्रमांक लागला. तर शिलॉंगचा क्रमांक सर्वात शेवटचा लागला.

111 शहरांत सर्वेक्षण
मूल्यांकनाला गेल्या वर्षी 16 जानेवारीपासून सुरुवात झाली आणि ते गेल्या वर्षी 20 मार्चपर्यंत करण्यात आले. 111 शहरांमधील एकूण 32 लाख 20 हजार नागरिक सर्वेक्षणात सहभागी झाले होते. भुवनेश्‍वरमध्ये सर्वाधिक नागरिकांचे सर्वेक्षण झाले. त्यानंतर सिल्वासा, दावणगेरे, काकीनाडा, बिलासपूर आणि भागलपूर यांचा क्रमांक लागतो.


Share this Newz