योगामुळेच शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यास मदत झाली : श्रीपाद नाईक

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

कोविड साथीच्या काळात योग या भारताने जगाला दिलेल्या अमूल्य भेटीमुळे लोकांना आपल्या केवळ शारिरीक आरोग्याचीच नव्हे, तर मानसिक आरोग्याचीही काळजी घेण्यास मदत झाली आहे, असे प्रतिपादन आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

‘द योगा इन्स्टिट्यूट’ने आपल्या अविरत सेवेची 102 वर्षे पूर्ण केल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या एका व्हर्च्युअल स्वरुपाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी त्यांच्या हस्ते ‘निस्पंद’ हे ‘टीवायआय मेडिटेशन अ‍ॅप’ सादर करण्यात आले.

नाईक पुढे म्हणाले, योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे आणि ती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ‘द योगा इन्स्टिट्यूट’ने केले आहे. कोविड साथीच्या कठीण काळात लोकांनी योगाची खरी मूल्ये शिकण्यास सुरुवात केली. योगाच्या सहाय्याने लोकांना त्यांचे शारिरीक स्वास्थ्य व प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत झालीच, त्याचबरोबर मानसिक व भावनिक आरोग्याचे व्यवस्थापनही त्यांना करता आले.

‘निस्पंद’ या अ‍ॅपच्या नियोजित सादरीकरणाची घोषणा मंत्री नाईक यांनी यावेळी केली. नाईक म्हणाले, आपल्या तळहातावर प्रत्यक्ष मेडिटेशन अवतरविणारे हे अ‍ॅप आहे. ध्यानधारणा करण्याच्या जगाच्या पद्धतींमध्ये ‘निस्पंद’ क्रांती घडविणार आहे. आपल्याला सर्वांगीण आरोग्य मिळविण्यात त्याची मोलाची मदत होईल.”

‘द योगा इन्स्टिट्यूट’च्या संचालिका डॉ. हंसा योगेंद्र म्हणाल्या, “द योगा इन्स्टिट्यूट’ने समाजाच्या, देशाच्या व जगाच्या सेवेत आज 102 वर्षे पूर्ण केली. कोविडच्या साथीचा सामना करण्यासाठी व त्याबाबत मदत पुरविण्यासाठी यंदा ‘गृहस्थयोग’ (हाऊसहोल्डर योगा) या सेवेत अनेक उपक्रम राबविले. भारतात व जगभरात अधिकाधिक लोकांपर्यंत ‘गृहस्थयोग’ ही संकल्पना नेण्यास ‘द योगा इन्स्टिट्यूट’ कटिबद्ध आहे.

लोकांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे गेली 102 वर्षे सातत्याने चाललेले कार्य हे संस्थापक, योगगुरु योगेंद्र यांच्या अधिपत्याखालील योगींच्या तीन पिढ्यांनी घालून दिलेल्या दृष्टिकोनामुळे, तसेच गेल्या शतकभरात ‘द योगा इन्स्टिट्यूट’च्या कुटुंबाचाच एक भाग बनलेल्या हजारो लोकांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे.


Share this Newz