दिल्ली : कोरोना कालावधीत जिम आणि हेल्थ क्लब बंद असल्याने सायकलच्या मागणीत वाढ झाली आहे. लॉकडाऊन दरम्यान मेपासून जुलैपर्यंत जवळपास ३४ लाख सायकलींची विक्री झाली आहे. म्हणजे दररोज सुमारे ३७ हजार सायकलींची विक्री झाली आहे. स्पोर्ट्स, गिअर्ड बाइक्स, किड्स व फॅन्सी बाइक्सच्या मागणीत विशेष वाढ झाली आहे.
भारत जगातील दुसरा सर्वात मोठा सायकल उत्पादक देश आहे. भारतात दरवर्षी २.२० कोटी सायकलींचे उत्पादन होते. संपूर्ण देशात सायकल उद्योगाशी संबंधित जवळपास ४ हजार युनिट्स आहेत. यातून जवळपास ५ लाखांपेक्षा जास्त लोक जोडले आहेत. यामध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त व्यावसायिक व युनिट्स लुधियानात आहेत. ऑल इंडिया सायकल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. के.बी. ठाकूर म्हणाले, ५८ वर्षांत मी आतापर्यंतच्या आयुष्यात सायकलच्या मागणीत एवढी तेजी पाहिली नाही. कोरोना काळात सरकारी ऑर्डर बंद असतानाही ही तेजी आहे. जवळपास २५ टक्के विक्री विविध राज्यांच्या सरकारी खरेदीवर अवलंबून असते. महामारीचे संकट संपल्यानंतरही मागणीही सुरू होईल. उद्योग जगतातील जाणकारांनुसार, भारतीय सायकल उद्योग सध्या ५-६ टक्क्यांनी वाढत आहे. मात्र, मागणीत मोठ्या प्रमाणात तेजी आल्याने उद्योगांत २० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. सायकलच्या प्रथम वापरकर्त्यांची संख्या वाढली आहे.
उद्योगासाठी सुवर्णकाळ
सायकल उद्योगासाठी हा सुवर्ण काळ आहे. मागणीबाबत बोलायचे झाल्यास आमच्या २.५ लाख सायकलींची ऑर्डर प्रलंबित आहे. मे महिन्यापासून उद्योग पुन्हा सुरू झाला होता. आम्ही एकटे दरमहा ४ लाखांहून जास्त सायकली तयार करतो. यामध्ये अन्य देशांना होणाऱ्या निर्यातीची संख्या नाही.
चीनचे अवलंबित्व संपवणे हे आव्हान
चीनवरील अवलंबित्व सर्वात मोठे आव्हान आहे. मात्र, चीनवरील अवलंबित्व उद्योगातील तेजी कायम राखणे, मागणी वेळेवर पूर्ण करण्यात भारतीय सायकल उद्योगासमोरील मोठे आव्हान आहे. आकडेवारीनुसार, भारत चीनकडून वार्षिक ५४१ कोटी रुपयांच्या सायकलच्या सुट्या भागांची आयात करतो. उद्योगाला लागणाऱ्या १०० सुट्या भागांपैकी १५ आयात कराव्या लागतात. याच पद्धतीने दरमहा ८ ते १० लाख प्रीमियम सायकलही आयात केल्या जातात.
- 14 कोटी सायकलींचे वार्षिक उत्पादन जगभरात होते.
- 09 कोटी सायकलींचे वार्षिक उत्पादन एकट्या चीनमध्ये होते.
- 2.2 कोटी सायकली दरवर्षी भारतात तयार होतात.
सायकल चालविण्याचे हे आहेत फायदे
1. मधुमेह प्रकार २ चे प्रमाण लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. कमी कष्टाची कामे किंवा व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेह होण्याची शक्यता असते. जे लोक दररोज ३० मिनीटं सायकल चालवतात त्यांना मधुमेह प्रकार-२ होण्याची शक्यता ४० टक्क्यांनी कमी होतो.
2. सायकल चालवण्याने ताकद, समतोल आणि समन्वय हे शारिरीक गुण वाढतात. यामुळे खाली पडणे, हाडे मोडणे याची शक्यता कमी होते. सायकल चालवताना सांध्यावर ताण कमी पडतो त्यामुळे दुखापत कमी होते.
3. मन उदास होणे, ताण तणाव, चिडचिडेपणा येणं हे सर्व सायकलिंगनं कमी होतं.
काय काळजी घ्यावी?
1) सायकलिंगने व्यायाम आणि मनोरंजन दोन्ही होतं. पण काळजी आवश्यक आहे. सायकल रस्त्यावर चालवत असाल तर हेल्मेट, नी पॅड, एल्बो पॅड वापरावे.
2) पाठीचा त्रास असणाऱ्यांनी जिम किंवा घरामध्ये ‘रेमकेंडेड बाईक’ चा वापर करावा. ज्यामुळे पाठीला आधार मिळतो.
3) सायकल निवडताना– सायलकमध्ये बरेच प्रकार आहे. व्यायामासाठी, खेळासाठी, प्रवासासाठी अथवा इतर काही गोष्टीसाठी यावरून सायकलची निवड करावी. सायकल कधीही ऑनलाईन विकत घेऊ नये. कारण तुमची गरज, उंची शरीराची ठेवण यावरून सायकलची निवड होते. दुकानदाराशी चर्चा करूनच सायकल खरेदी करावी.
4) जर बाहेर सायकल चालवणं शक्य नसेल तर घरातील सायकल घ्यावी किंवा जिममध्ये जाऊन स्पिंग बाईक, रेमकेंडड बाईक, स्टेशनरी बाईकचा वापर करावा. दोन्हीचे फायदे सारखेच आहेत. यामध्ये अजून एक प्रकार येतो. ‘विंड ट्रेनर’ ज्यामध्ये तुम्ही सायकलला घरात स्टॅण्ड लावून काही काळ पुरता घरात एका जागी वापरू शकतो.
5) कडक आणि छोटी सीट असणाऱ्या सायकलचा वापर टाळा. सिटची उंची अशी ठेवा ज्यामुळे गुडघा पूर्ण वाकणारही नाही किंवा पूर्ण पाय सरळही होणार नाही. पायात २५ अंशाचा कोन असूदेत. ज्यामुळे गुडघ्यावर ताण न पडता लॉकही होणार नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीम बंद आहेत. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सायकलिंग हा उत्तम पर्याय आहे. सायकल चालवल्यानं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. नियमित सायकल चालवल्यानं हृदय फुफ्फुसे आणि रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे हृदय विकाराचं प्रमाण कमी होतं. हृदयाच्या मांसपेशींची ताकद वाढते. फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे सायकल संस्कृती वाढीस लागणे आवश्यक आहे.
मिलिंद संधान, शिक्षक व सायकलप्रेमी






Leave a Review