राहुल गांधींचं ट्विट
नवी दिल्ली :
सरकारने आता कर्ज देण्याची नव्हे, तर खर्च करण्याची आवश्यकता आहे. गरीबांना पैसा द्या. उद्योजकांना कर कपात देऊ नका. खर्च वाढला तरच अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या रिपोर्टचा हवाला देत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘मीडियाच्या माध्यमातून लक्ष विचलित करुन गरीबांचे भले होणार नाही’ असे राहुल यांनी म्हटले आहे.
गेल्या अनेक महिन्यापासून मी, जे इशारे देत होतो, त्यावर आरबीआयने आता शिक्कामोर्तब केलं आहे. सरकारने आता कर्ज देण्याची नव्हे तर खर्च करण्याची आवश्यकता आहे. गरीबांना पैसा द्या. उद्योजकांना कर कपात देऊ नका. खर्च वाढला तरच अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. मीडियाच्या माध्यमातून लक्ष विचलित करुन गरीबांचे भले होणार नाही किंवा आर्थिक आपत्तीही गायब होणार नाही, असे राहुल गांधी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
काय सांगतो आरबीआयचा वार्षिक अहवाल ?
करोना विषाणूजन्य साथीच्या धक्क्यातून अर्थव्यवस्था बाहेर येईपर्यंत आणि तिला करोनापूर्व गती येईपर्यंत सरकारलाच खर्च वाढवून मागणीला चालना द्यावी लागेल, असे आग्रही मत रिझव्र्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या २०१९-२० सालच्या वार्षिक अहवालातून व्यक्त केले आहे.
वर्षभरात मागणीविषयक केले गेलेले मूल्यांकन हेच सूचित करते की, वस्तू व सेवा उपभोगाला विलक्षण मोठा धक्का बसला आहे आणि त्यात करोनापूर्व पातळीपर्यंत सुधारणेसाठी खूप वेळ लागेल, असे रिझव्र्ह बँकेने स्पष्ट केले आहे. खासगी क्षेत्रातून मागणीची वानवा असताना, सरकारने उपभोगवाढीचे उपाय योजून मागणीला बळ देणे भाग आहे.
विशेषत: परिवहन सेवा, आतिथ्य आणि करमणूक उद्योग ठप्प आणि सांस्कृतिक क्रियाकलाप थंडावले आहेत आणि साथ प्रतिबंधात्मक उपाय सुरू राहिल्याने या क्षेत्रात इतक्या लवकर सामान्य स्थिती परतणे अवघड आहे, याकडे रिझव्र्ह बँकेने अहवालात लक्ष वेधले आहे.







Leave a Review