दैनंदिन वापरातील वस्तूंवरील जीएसटी दरात कपात

Share this Newz

नवी दिल्ली : 
सरकारने माजी अर्थ मंत्री अरुण जेटली यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आज पुन्हा एकदा निवडक वस्तूंवरील जीएसटी कर कमी केला आहे. यामध्ये दैनंदिन वापरातील वस्तू साखर, मिठाई, राईचा सॉस, केचअप, साबण, दंतमंजन, मिनरल वॉटर, अगरबत्ती, खाद्य तेल, दुग्धजन्य पदार्थ, हेअर ऑइल, १००० रुपयांपर्यंतचे फुटवेअर, रंग या वस्तूंच्या सेवा दरात कपात केली आहे.

भारतात १ जुलै २०१७ रोजी जीएसटी ही करप्रणाली लागू करण्यात आली. तेव्हापासून सातत्याने जीएसटी दर कमी करण्यात आला असल्याचे सरकारने म्हटले आहे. आता केवळ लक्झरी वस्तूंसाठी २८ टक्के जीएसटी आहे. एकूण २३० वस्तूंपैकी २०० वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आला असल्याचे अर्थ खात्याने ट्विटमध्ये म्हटले आहे. वस्तू आणि सेवा कर प्रणालीची घडी बसवण्यापासून त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यात दिवंगत अरुण जेटली यांचा मोलाचे योगदान आहे. देशातील कर प्रणालीत ऐतिहासिक सुधारणा म्हणून त्याची नोंद होईल, असे ट्विट करून अर्थ खात्याने जेटली यांना आदरांजली वाहिली आहे.

जीएसटी लागू झाल्यानंतर जीएसटी करदात्यांची संख्या दुप्पट झाली आहे. सध्या १ कोटी २४ लाख जीएसटी करदाते आहेत. संपूर्ण जीएसटी प्रक्रिया आता स्वयंचलित झाली असल्याचा दावा अर्थ खात्याने केला आहे. आतापर्यंत जीएसटी प्रणालीत ५० कोटी कर परतावे देण्यात आले. तर १३१ कोटी ई वे बिल तयार झाली असल्याचे सरकारने म्हटले आहे.

           अर्थव्यवस्थेतला महत्त्वाचा घटक असलेल्या स्थावर मालमत्ता क्षेत्राला सावरण्यासाठी सरकारने विशेष काळजी घेतली आहे. गृहनिर्माण क्षेत्रासाठी ५ टक्के जीएसटी असून, परवडणाऱ्या घरांसाठी तो केवळ १ टक्का आहे.

Share this Newz