मुंबई :
‘कोव्हिड-19’ च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांनूसार यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने, गर्दी टाळून व आवश्यक ती खबरदारी घेऊन साजरा करण्याच्या सूचना आणि आवाहन यापूर्वीच पालिकेनेही केले आहे. परंतू, गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी समुद्रात जाण्यास बंदी महापालिकेद्वारे घालण्यात आल्याचे वृत्त समाजमाध्यमांत प्रसारित होत आहे. परंतू, समुद्रात विसर्जन करण्यावर बंदी महापालिकेद्वारे घालण्यात आलेले नसल्याची माहिती पालिकेने दिली आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिकेतर्फे मुंबई क्षेत्रात 167 कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेली असून सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन गणेशाचे विसर्जन करण्याचे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. गणेश भक्तांच्या सुविधेसाठी महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी अधिक संख्येने कृत्रिम तलाव तयार करण्याचे निर्देश महापालिकेच्या विभागीय कार्यालयांना यापूर्वीच देण्यात आले आहेत. ज्यानुसार आजपर्यंत 167 कृत्रिम तलाव तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र असे असले तरीही समुद्रात विसर्जन करण्यावर महापालिकेने बंदी घातलेली नाही. समुद्र किनार्यालगतच्या एक ते दोन किलो मीटरच्या परिसरात राहणाऱ्या गणेश भक्तांनी आपल्या गणेश मूर्तींचे विसर्जन हे समुद्रात करण्यास हरकत नाही. तर इतरांनी म्हणजेच जे भाविक समुद्रालगत रहात नाहीत अशांनी प्राधान्याने घरच्या-घरी किंवा कृत्रिम तलावातच गणेश मूर्तींचे विसर्जन करावे; अशी महापालिका प्रशासनाची सूचना आहे. महापालिका प्रशासन व राज्य शासन यांनी वेळोवेळी केलेल्या सूचना / आवाहनाचे पालन करावे. त्याचबरोबर कोरोना च्या पार्श्वभूमीवर शारीरिक दुरीकरण, मास्क, सॅनिटायझर वापरुन हा उत्सव पार पाडावा, असे आवाहनही पालिकेकडून करण्यात येत आहे.









Leave a Review