सिंधुताई सपकाळ यांचे निधन ; एका पर्वाचा अस्त

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पुणे : 

अनाथांची माय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (वय 73) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. पुण्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. सिंधुताईंचे महिनाभरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते.

महाराष्ट्राची मदर तेरेसा अशी त्यांची ओळख होती.  सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता.

त्यांनी कठीण प्रसंगाना तोंड देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांना 2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता तर 2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशा हजारो अनाथांची माय आज काळाच्या पडद्याआड गेली.


Share this Newz