राम मंदिर निर्णयात मोदींचे योगदान नाही; स्वामी यांनी दिले राजीव गांधींना श्रेय

Share this Newz

The Newz Biz Team, दिल्ली

अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर राम मंदिराच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, राम मंदिराच्या निर्णयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काहीही योगदान नाही. सरकारमध्ये असताना त्यांनी यासंदर्भात असे कोणतही काम केलेले नाही, असे सांगत भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राम मंदिराच्या प्रश्नावरून मोदींवर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे स्वामी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधींना याचे श्रेय दिले आहे. टीव्ही ९भारतवर्ष वृत्तवाहिनीशी बोलताना स्वामी यांनी हे विधान केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निकालानंतर अयोध्येत राम मंदिराच्या कामाला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या कामाची पायाभरणी करण्यात आली. आता कामही सुरू झाले आहे. असे असतानाच भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांचे यामध्ये कोणतेही योगदान नाही. राम मंदिर प्रकरणात सर्व चर्चा आम्ही लोकांनी केली आहे. सरकारच्या वतीने त्यांनी असे कोणतेही काम केलेले नाही, जे मला माहिती आहे किंवा ज्यामुळे म्हणू शकतो की, निर्णय आला. मूळात ज्यांनी यात काम केले आहे, त्यांचे मी नाव घेतले आहे. यात पहिले नाव राजीव गांधी यांचे आहे,” असे स्वामी म्हणाले आहेत.

भाजपाचे आमदार तेजिंदर सिंह बग्गा यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. ही मुलाखत कधीची आहे, याबाबतचा उल्लेख बग्गा यांनी केलेला नाही. मात्र, या मुलाखतीवरून बग्गा यांनी सुब्रमण्यम स्वामी यांच्यावर टीका केली आहे. “गिरगिट (रंग बदलणारा सरडा) स्वामी म्हणत आहेत की, पंतप्रधान मोदी यांचे राम मंदिर उभारणीमध्ये कोणतेही योगदान नाही आणि राजीव गांधींना यांचे श्रेय देत आहे, अशी टीका बग्गा यांनी केली आहे.

Share this Newz