हरितीकरणाचा ध्यास घेतलेली संस्था : मराठवाडा जनविकास संघ

Share this Newz

पुणे :
कामाच्या शोधात पिंपरी चिंचवड परिसरात आलेल्या अरुण पवार यांनी व्यवसायात आपला चांगला जम बसविला. पण आपण ज्या भूमीतून आलो आहोत त्या मराठवाड्यातील बंधू भगिनींसाठी काहीतरी करण्याची तळमळ मनी होतीच. सर्व बांधव एकत्र यावेत, एकमेकांच्या सुखदुःखात सामील होता यावे, या उद्देशाने ’मराठवाडा जनविकास संघ’ नावाचे छोटे रोपटे अरुण पवार यांनी लावले. आज याच रोपट्याने बाळसे धरले असून, पिंपरी-चिंचवड परिसरात राहत असलेले मराठवाड्यातील लाखो बांधव एका धाग्यात गुंफण्याचे काम करण्यात संस्था यशस्वी ठरली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहर परिसरात राहणार्‍या सर्व बांधवाना एकत्रित करुन सुसज्ज मराठवाडा भवन निर्मिती संकल्प अरुण पवार यांनी केला आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड स्थित मराठवाड्यातील बांधवांची नोंदणी, निधी संकलनाचे काम सुरू करण्यात आले आहे. आजपर्यंत सुमारे दीड लाखाहून अधिक बांधवांची नोंदणी झाली आहे. सध्याच्या कोरोना काळात भुकेले लोक असो किंवा मुके प्राणी यांच्या पोटाची भूक भागविण्याची जबाबदारी अरुण पवार पार पाडत आहेत.
          आज दुष्काळग्रस्त भागातील वन्य  पशु-पक्षी पाण्याच्या शोधार्थ वणवण भटकत आहेत. पाण्यावाचून हरणे, माकडे, कोल्हे, लांडगे, मोर, कावळे, चिमन्या आदी पशु-पक्ष्यांना पाण्यावाचून जीव गमवावा लागत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे, या उद्देशाने पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे गुरव स्थित मराठवाडा जनविकास संघ ही सामाजिक संस्था प्रयत्न करते आहे. सध्या तरी आपल्या पातळीवर स्वत:च ही संस्था प्रयत्न करीत आहे. दुष्काळग्रस्त अशा मराठवाड्यातील तुळजापूर-उस्मानाबाद-लातूर या पट्ट्यात वन्य प्राण्यांसाठी तब्बल 107 पाण्याच्या टाक्या संस्थेने बांधल्या आहेत. एवढेच नाही तर संपूर्ण उन्हाळ्यात या टाक्यांमध्ये पाणी टाकण्याचे कामही संस्था करीत आहे. चांगला पाऊस पडेपर्यंत या पशुपक्ष्यांना पाणी पुरविले जाते. आजघडीला मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार हे पाण्याच्या सहा टँकरने पाणी पुरविण्याचे काम मोफत करीत आहेत.

महत्त्वाचे म्हणजे दुष्काळग्रस्त भागातील वन्य पशुपक्ष्यांबरोबरच लोकांना मोफत पाणी पुरविण्याचे महत्त्वाचे कामही मराठवाडा जनविकास संघ करीत आहे. अरुण पवार हे झाडे लावण्यासाठी सहा फुट उंचीचीच झाडे निवडतात. ही झाडे मोठे खड्डे खोदून लावली जातात. या झाडांचे संरक्षण व्हावे, यासाठी तेवढ्याच उंचीच्या जाळ्या बसविल्या जातात. एवढेच नाही तर झाडे लावल्यापासून पुढील तीन वर्षे म्हणजे झाडे दहा फुट उंचीची होईपर्यंत या झाडांना पाणी मोफत पुरविले जाते. त्यामुळे संस्थेने आजपर्यंत लावलेली हजारो झाडे दिमाखात उभी आहेत.

           मराठवाड्यात पडलेल्या भीषण दुष्काळात आपल्या बांधवांच्या मदतीला धावून जात त्यांनी ’पशुधन वाचवा’  मोहीम यशस्वीपणे राबविली. या मोहिमेंतर्गत वीस गावातील जनावरांचा आणि वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी 107 पाण्याचे हौद स्वखर्चाने बांधले आहेत. संपूर्ण उन्हाळ्यात टँकरने यामध्ये पाणी सोडले जाते. आजघडीला मराठवाडा जनविकास संघाचे सहा पाण्याचे टँकर दुष्काळग्रस्तांच्या सेवेसाठी दिले आहेत. ’झाडे वाचली तरच पृथ्वी वाचेल’, याप्रमाणे अरुण पवार दरवर्षी विविध ठिकाणी वृक्षारोपण करत आले आहेत. यामध्ये मराठवाड्यातील धारूर, मोर्डा, तुळजापूर, उस्मानाबादमधील अनेक गावे त्यांनी हिरवीगार केली आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरातही पिंपळे गुरव, देहू, आळंदी, भंडारा डोंगर, मरकळ, चर्‍होली, वडगाव शिंदे, दापोडीमध्ये वृक्षारोपण केले आहे. फक्त वृक्षारोपण करून ते थांबले नाहीत, तर त्या झाडांना जाळी बसवून झाड दहा फुटांचे होईपर्यंत त्याची काळजी ते घेत असतात. दर आठवड्याला टँकरद्वारे या झाडांना पाणी देतात. त्यांनी स्वतःची रोपवाटिका तयार केली असून, वड, पिंपळ, कडुनिंब अशी देशी रोपे 6 फूट वाढवून त्यांचे रोपण केले जाते.
          दिवाळीसारख्या सणाचा आनंद वंचित घटकालाही घेता यावा, यासाठी दरवर्षी पिंपळे गुरव येथे सर्वात आधी सफाई कामगार महिला पुरुषांना पूर्ण पोशाख आणि मिठाई वाटप केले जाते. अंध, अनाथ मुलांना कपडे- शालेय साहित्य, पिंपरी चिंचवड महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप दरवर्षी संस्थेच्या माध्यमातून केले जाते. महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करून या माध्यमातून त्यांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाते.
कारगील विजय दिन राष्ट्रभक्ती संस्करण प्रदर्शन आयोजित करून आपल्या देशासाठी लढलेल्या सैनिकांची आठवण सदैव मनात ठेवण्याचा प्रयत्न, तसेच 17 सप्टेंबर ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन‘ साजरा करीत पिंपरी-चिंचवडमधील सामाजिक संघटनापुढे एक देशभक्तीचा आदर्श ठेवला आहे. पुलवामा हल्यात शहीद झालेले बुलढाणा जिल्ह्यातील जवान संजयसिंह भिकनसिंह राजपूत व कै. नितीन शिवाजी राठोड यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक्कावन्न हजार रुपयांची मदतही संस्थेतर्फे करण्यात आली.
          दर रविवारी स्वच्छता अभियान राबवून विविध वक्त्यांची व्याख्याने, भाषणाच्या माध्यमातून समाजाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचे सामाजिक कामही संस्थेने तडीस नेले. शिक्षणापासून वंचित असलेल्या गरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने स्वतःच्या जागेत सुरू केलेल्या वस्ती  शाळेत कचरावेचक, बांधकाम मजुरांची पन्नास मुले मुली शिक्षण घेत आहेत. अशा विविध क्षेत्रात मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अरुण पवार यांचा राज्यातील विविध संस्थांनी यथोचित सन्मान केला आहे. त्यांचा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला आहे.

Share this Newz